सिरोंचा तहसील कार्यालयात भाड्याच्या जनरेटरचा आधार; लाखो रुपयांचे शासकीय जनरेटर धूळ खात, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
सिरोंचा (प्रतिनिधी):
मा. भारत निवडणूक आयोग आणि मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision) मोहीम 20 जून ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सुरू आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेत सिरोंचा तहसील कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतानाच, कार्यालयातील मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
सिरोंचा तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे तहसील प्रशासनाला भाड्याने जनरेटर आणण्याची वेळ आली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे शासनाने सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च करून तीन-चार वर्षांपूर्वी बसवून दिलेले जनरेटर सध्या बंद अवस्थेत पडून असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारी जनरेटरची दुरुस्ती न करता भाड्याच्या जनरेटरवर खर्च का केला जात आहे? लाखो रुपयांच्या शासकीय मालमत्तेची देखभाल का झाली नाही? या निष्काळजीपणामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मतदार यादी पुनरिक्षणासारख्या महत्त्वाच्या कामासाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक असताना, प्रशासनाला भाड्याच्या जनरेटरचा आधार घ्यावा लागणे ही बाब चिंताजनक मानली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेले शासकीय जनरेटर तातडीने दुरुस्त करावे, तसेच या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रश्न उपस्थित होतात…
15–20 लाखांचे शासकीय जनरेटर बंद का पडले?
देखभाल आणि दुरुस्तीसाठी जबाबदार कोण?
भाड्याच्या जनरेटरवर होणारा खर्च कोणाच्या जबाबदारीवर?
शासनाच्या पैशांचा अपव्यय थांबणार कधी?
“मतदार यादी पुनरिक्षण सुरू… पण तहसील कार्यालयात लाखो रुपयांचे जनरेटर बंद, भाड्याच्या जनरेटरवर सरकारी कामकाज! जबाबदारांवर कारवाई होणार का?”
