खत टंचाईविरोधात भाग्यश्री ताईंचा रणशिंग; राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याची आठवण करून देणारा संघर्ष!
सिरोंचा
शेतकरी खतासाठी वणवण फिरत आहे, शेती संकटात सापडली आहे, पण प्रशासन मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. अशा वेळी एक महिला कंबर कसून मैदानात उतरली आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढण्याचा निर्धार केला. त्या म्हणजे भाग्यश्री ताई.
इतिहासात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी अन्यायाविरुद्ध तलवार उगारून स्वाभिमानाची लढाई लढली. त्याच शौर्याची, धैर्याची आणि लढाऊ वृत्तीची आठवण भाग्यश्री ताईंच्या संघर्षातून अनेकांना होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. संकट पाहून मागे हटणे नव्हे, तर अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, हीच त्यांची ओळख बनत चालली आहे.
खत टंचाईच्या प्रश्नावर भाग्यश्री ताईंनी एकट्याने लढ्याची मशाल हाती घेतली; मात्र हा आवाज उठताच शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक स्वतःहून त्यांच्या पाठीशी उभे राहू लागले. कोणत्याही आवाहनाची गरज पडली नाही—शेतकऱ्यांचा आक्रोश आणि भाग्यश्री ताईंचा संघर्ष यांची सांगड घालत जनतेनेच आंदोलनाला आपले मानले.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू झालेला हा लढा आता एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नसून जनआंदोलनाचे रूप धारण करत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर हा जनक्षोभ आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“अन्यायासमोर झुकायचं नाही, शेतकऱ्यांचा हक्क मिळेपर्यंत लढायचं!” या निर्धाराने भाग्यश्री ताई उभ्या ठाकल्या असून, त्यांच्या या संघर्षामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
