जीवनगट्टा गाव अंधारात; दिवसाढवळ्या सुरू रस्त्यावरील दिवे, रात्री मात्र नागरिकांना अंधाराचा सामना
एटापल्ली (प्रतिनिधी): गिरीश नरोटे
नगरपंचायत एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या मौजा जीवनगट्टा येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील अनेक रस्त्यावरील विद्युत दिवे रात्री बंद राहतात, तर दिवसा मात्र अनेक पोलवरील दिवे विनाकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वीजेची उधळपट्टी होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गावातील ज्या ठिकाणी रस्त्यावरील दिव्यांची सर्वाधिक गरज आहे, त्या अनेक पोलवर दिवेच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, गावातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांमध्ये सहापैकी केवळ एकच दिवा सुरू असून उर्वरित पाच दिवे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री अंधारात बाहेर पडताना नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय, जीवनगट्टा गावातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. कमी-जास्त दाब आणि सततच्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे अनेक घरांतील विद्युत उपकरणे खराब होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या गावाचे नगरसेवक स्वतः याच गावात वास्तव्यास असूनही गावातील मूलभूत समस्या अद्याप कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित वीज विभागाने तातडीने दखल घेऊन बंद असलेले रस्त्यावरील दिवे व हायमास्ट दिवे सुरू करावेत, तसेच गावातील सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
