*शेतकऱ्यांच्या खत प्रश्नावर राष्ट्रवादीचे ‘चष्मा भेट’ आंदोलन; प्रशासनाकडून लेखी आश्वासन*
*माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन यशस्वी संपन्न*
अहेरी :- अहेरी तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या युरिया व इतर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अहेरी विधानसभा यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपविभागीय कृषी कार्यालय, अहेरी येथे ‘चष्मा भेट’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावे, कृत्रिम टंचाई रोखावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.
यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली. शेतकऱ्यांना आवश्यक ते खत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे लेखी आश्वासन कृषी विभागाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना वेळेत खत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
