परिश्रमाशिवाय पर्याय नाही – देवाजी गोटा कमलापूर :
आदिवासी कुटुंबात जन्म झाला. घरात अठरा विश्व दारिद्र्य होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी चंद्रपूरला गेलो. वर्तमानपत्र वाटले. स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे जायचे असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र कार्यालय रेपनपल्ली अंतर्गत नियत क्षेत्र देवलमरीचे वनरक्षक देवाजी गोटा यांनी केले.
भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कमलापूर येथे ‘माझा शैक्षणिक प्रवास आणि संघर्ष’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षक सुनील तुरकर भगवंतराव हायस्कूल कमलापूर होते. प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक आर. जे. शेख यांची होती.
पुढे बोलताना वनरक्षक देवाची गोटा म्हणाले की, स्थानिक भौगोलिक परिस्थिती विपरीत आहे. पालकांमध्ये शैक्षणिक अज्ञान आहे. परिसर दुर्गम आहे यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांच्या वाट्याला संघर्ष येत आहे मात्र या संघर्षावर मात करता येऊ शकते. कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण घेत असताना शिक्षकांशी समन्वय साधून आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्यावी.
पूर्वीच्या स्थितीत आणि आत्ताच्या स्थितीत फरक आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम व्यापक आहे. शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यापक अभ्यासक्रमची माहिती तात्काळ होते. ग्रामीण भागात उशिरा होते. म्हणून यासाठी शिक्षकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विषयाची माहिती प्राचार्य किशोर बुरबुरे यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन माध्यमिक शिक्षक प्रवीण चौधरी यांनी केले. आभार माध्यमिक शिक्षक खुशाल रणदिवे यांनी मांनले.
