झिंगानूरच्या शासकीय आश्रमशाळेत ‘वन महोत्सव’ जल्लोषात; सीडबॉलद्वारे हरित क्रांतीची मुहूर्तमेढ!
वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची रुजवली बीजे
झिंगानूर (ता. सिरोंचा)
पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. सिरोंचा वनपरिक्षेत्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
उपवनसंरक्षक (DCF) श्री. नवकिशोर रेड्डी आणि सहाय्यक वनसंरक्षक (ACF) श्री. अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) श्री. प्रशांत नरेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
“प्रत्येकाने एक झाड लावा, ते जगवा!”
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रशांत खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येक नागरिकाची आयुष्यभराची जबाबदारी आहे. वाढते शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून सीडबॉलसारख्या प्रभावी माध्यमातून दुर्गम भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्षनिर्मिती शक्य आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
वन कर्मचारी व मजुरांनी तयार केले हजारो सीडबॉल
या मोहिमेसाठी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व वनमजुरांनी स्थानिक फळझाडांच्या बिया, माती व शेण यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात सीडबॉल तयार केले. कमी खर्चात आणि प्रभावी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता; प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा लाभ
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सीडबॉल तयार करण्याचे आणि त्यांचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. “मातीच्या गोळ्यातून झाड कसे उगवते?” अशा अनेक प्रश्नांची वन अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचे धडे आत्मसात केले.
२ ते ३ हेक्टर पडीक जमिनीवर बीजप्रसारण
प्रशिक्षणानंतर आश्रमशाळेच्या परिसरातील सुमारे २ ते ३ हेक्टर मोकळ्या व पडीक जागेवर हजारो सीडबॉलचे प्रसारण करण्यात आले. येत्या पावसाळ्यात या बियांपासून मोठ्या प्रमाणात फळझाडे उगवून परिसर हिरवागार होईल, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला.
समाजसेवक, ग्रामस्थ व शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती
कार्यक्रमाला समाजसेवक श्री. रामचंद्र कुमरी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, वन विभागाचे अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, वनमजूर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वन विभाग, शाळा आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला.
— प्रतिनिधी : सुरेश तिट्टीवार
त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
