“जनतेची सेवा हाच धर्म; प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे!” — आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा कार्यकर्त्यांना एल्गार
गडचिरोलीतील भव्य पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात संघटन बळकटीकरणाचा निर्धार; बूथ ते गावपातळीपर्यंत जनतेचा विश्वास जिंकण्याचे आवाहन
अहेरी | प्रतिनिधी : तिरुपती मडावी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून, गडचिरोली येथे झालेल्या भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात अहेरीचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण केला.
“निवडणूक आली की जनता आठवायची नाही; वर्षभर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हा. शासनाच्या योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवा. जनतेचा विश्वास जिंकणारा कार्यकर्ता कधीच पराभूत होत नाही,” असा दमदार संदेश देत डॉ. आत्राम यांनी प्रत्येक गावात पक्षाची ताकद वाढविण्याचा एल्गार केला.
डॉ. आत्राम म्हणाले की, पक्षाची खरी ताकद मोठ्या सभांमध्ये नसून गावागावातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक बूथ, प्रत्येक वाडी आणि प्रत्येक गावात सक्षम संघटना उभी राहिली तर कोणतीही निवडणूक जिंकणे कठीण राहणार नाही. युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना पक्षाशी जोडून जनतेच्या विश्वासावर विजयाचा पाया रचावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात युवती जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी नगराध्यक्ष जेसाभाई मोटवानी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा घेत आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात बूथ बळकटीकरण, जनसंपर्क अभियान, नव्या कार्यकर्त्यांची नोंदणी आणि शासनाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे मेळाव्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, “जनतेची सेवा, मजबूत संघटना आणि विजयाचा निर्धार” हा संदेश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते गावागावात कामाला लागणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
