सरकारी शाळांना कुलूप, खाजगी शाळांना मोकळे रान? सिरोंच्यात शिक्षणावर कुलुप की गरीबांच्या भविष्यावर?
शासन ‘शिक्षणाला प्राधान्य’ म्हणते; मग सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद का? संतप्त पालकांचा सवाल; जि.प. शाळांत इंग्रजी माध्यम सुरू केल्यास गरीब-श्रीमंत एकाच बाकावर बसतील!
सिरोंचा | प्रतिनिधी
“शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध आणि घटनात्मक हक्क आहे.” शासन सातत्याने शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचा दावा करत असताना, सिरोंचा तालुक्यातील अनेक प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय मात्र ग्रामीण व आदिवासी भागातील पालकांच्या जिव्हारी लागला आहे. शासन गरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे की शिक्षण व्यवस्थेलाच खासगीकरणाच्या दिशेने ढकलत आहे, असा संतप्त प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.
शिक्षकांची कमतरता, घटती विद्यार्थी संख्या आणि शाळांचे स्थलांतर ही कारणे पुढे करून शिक्षण विभागाने अनेक शाळांना टाळे ठोकले. मात्र, ही कारणे म्हणजे प्रशासनाचे अपयश लपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शाळा बंद करण्याऐवजी शिक्षक भरती, दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे शिक्षणप्रेमी सांगत आहेत.
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश कुटुंबे गरीब व आदिवासी आहेत. अशा परिस्थितीत हजारो रुपयांची फी, वाहतूक आणि इतर खर्च परवडत नसल्याने अनेक पालकांना मुलांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविणे शक्य होत नाही. काही पालक कर्ज काढून किंवा मजुरी करून मुलांना खासगी शाळेत प्रवेश देतात; मात्र वाढत्या खर्चामुळे अनेक मुलांचे शिक्षण मध्येच खंडित होते. याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावर आणि मानसिक विकासावर होत असल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत.
सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की, सरकारी शाळा बंद करून शासन खासगी शाळांना प्रोत्साहन देत आहे का? जर जिल्हा परिषद शाळाच बंद झाल्या तर ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी नेमके कुठे जावे? हा प्रश्न आज प्रत्येक पालकाच्या मनात आहे.
उपाय काय?
शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मत मात्र स्पष्ट आहे. जिल्हा परिषद शाळा बंद करण्याऐवजी त्याच शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत. यामुळे गरीब आणि श्रीमंत कुटुंबांतील मुले एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकतील. सामाजिक भेदभाव कमी होईल, शिक्षणात समान संधी निर्माण होईल आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनाही दर्जेदार इंग्रजी शिक्षण आपल्या गावातच मिळेल.
आज श्रीमंतांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि गरीबांची मुले बंद पडलेल्या सरकारी शाळांच्या उंबरठ्यावर उभी राहण्याची वेळ आली आहे. ही दरी कमी करण्यासाठी शासनाने धाडसी निर्णय घेणे गरजेचे आहे.
जनतेची ठाम मागणी
सिरोंचा तालुक्यातील पालक, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, बंद करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा तातडीने सुरू कराव्यात. तसेच सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करून गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी द्यावी.
“सरकारी शाळा वाचवा… गरीबांच्या लेकरांचे भविष्य वाचवा… शिक्षणात भेदभाव नको, समान संधी हवी!” अशी जोरदार हाक आता सिरोंचा तालुक्यातून दिली जात आहे.
आपण आपले प्रगट करा गरीबाला शिक्षण मिडणार
सुरेश तिपट्टीवार
