स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत वृक्षारोपण
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश
सपांदक सुरेश तिपट्टीवार
दि. २२ जुलै २०२६
राज्याचे दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून स्व. अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, “वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भावी पिढ्यांसाठी हिरवाईचा अमूल्य ठेवा जपण्याची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, उपविभागीय वनाधिकारी शिशुपाल पवार, वनपरिक्षेत्राधिकारी नारायण इंगळे तसेच वन विभागाचे अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी स्व. अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अहेरी परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी वन विभागाच्या उपक्रमांना नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ठळक मुद्दे
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण
आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते वृक्षलागवड
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना संकल्प करण्याचे आवाहन
वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
अहेरी हिरवागार करण्यासाठी लोकसहभागावर भर
