समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
सुरेश तिपट्टीवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील भव्य समाधान शिबिराचे आयोजन अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये उत्साहात पार पडले.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, “समाधान शिबिर हा केवळ शासकीय उपक्रम नसून प्रशासनाला थेट जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांची मोठी बचत होत आहे. शासनाचा पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान कारभार अशा उपक्रमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, विविध तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच तालुक्यांतील नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवा
अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील महसूल, पंचायत राज, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, आदिवासी विकास, समाजकल्याण, शिक्षण, ग्रामविकास, वन, अन्न व नागरी पुरवठा, रोजगार हमी, महावितरण, जलसंपदा आणि बँकिंग विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांना विविध योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करून दिली.
शिबिरात उत्पन्न, जात, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, नॉन-क्रीमी लेयर आदी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच पीक विमा, कृषी मार्गदर्शन, महिला बचतगट, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सामाजिक सुरक्षा योजना, आरोग्य सेवा आणि आधारसंबंधी मार्गदर्शनही देण्यात आले.
लाभार्थ्यांना दाखले, धनादेश व शेती साहित्याचे वितरण
कार्यक्रमादरम्यान अनेक लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे, धनादेश तसेच शेतीची अवजारे, खत आणि बियाण्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेतीची कामे सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सर्व विभागांच्या स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागासह विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही कार्यक्रम संपेपर्यंत पावसानेही विश्रांती घेतल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
जनतेच्या दारी शासनाच्या सेवा पोहोचविणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र अहेरी येथे पाहायला मिळाले.
