अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनामपल्ली ग्रामपंचायतीत वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम
सुरेश तिपट्टीवार
स्वर्गीय महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनामपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, युवक, महिला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून “एक वृक्ष – एक जीवन” हा संदेश देण्यात आला. पर्यावरण संवर्धन, हरित ग्राम निर्माण आणि भावी पिढीसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले नेतृत्व, शेतकरी, ग्रामीण विकास, सिंचन, पायाभूत सुविधा आणि लोककल्याणाच्या योजनांमधील त्यांचे योगदान प्रेरणादायी असून, त्यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणासारखा समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. जनामपल्ली ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
