अहेरीतील मॉडेल स्कूलमध्ये शिक्षकांची कमतरता; २५० विद्यार्थ्यांसाठी केवळ तीन शिक्षक
पूर्णवेळ शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी : शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया मानला जातो. मात्र अहेरी येथील मॉडेल स्कूलमध्ये तब्बल २५० विद्यार्थ्यांसाठी केवळ तीन शिक्षक कार्यरत असल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शाळेत तातडीने पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी पालकांनी केली आहे.
यासंदर्भात पालकांनी अहेरी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यंत अपुरी असून अवघ्या तीन शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा शैक्षणिक भार पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन, विषयानुसार अध्यापन आणि दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण झाले आहे.
पालकांनी सांगितले की, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तातडीने आवश्यक संख्येने पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचे गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाने तातडीने दखल घ्यावी
शिक्षकांची कमतरता कायम राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ असल्याचे पालकांनी स्पष्ट केले असून, शिक्षण विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन मॉडेल स्कूलमध्ये आवश्यक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालकांचा इशारा
“२५० विद्यार्थ्यांसाठी केवळ तीन शिक्षक ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी,” अशी मागणी बशीर शेख, अनंत आलाम, जगदीश जलारपवार, राखी मद्देरलावर, ममता भीमनपल्लीवार, इरफान कुरेशी, शाहिद शेख, ज्योती उपलपवार, रामदास ओंडरे, शाह अनेल यांच्यासह पालकांनी निवेदनाद्वारे केली.
ठळक मुद्दा
“एका बाजूला शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, तर दुसऱ्या बाजूला शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे शिक्षणाचे अक्षरशः तीन तेरा वाजत आहेत.”
