गडचिरोली : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुटी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सुगत उराडे | प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २९ जुलै : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी २९ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया आणि इंद्रावती नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच नाले-नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) तसेच इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनाही ही सुटी लागू राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
