माओवादी असल्याचा बनाव करून दहशत पसरविण्याचा कट उधळला!
पोमके फुलणार हद्दीत बॅनर-पत्रके लावणारे सहा आरोपी गजाआड; गडचिरोली पोलिसांची सलग दुसरी कठोर कारवाई
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. २९ जुलै २०२६ | गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचा खोटा बनाव करून नागरिकांच्या मनात भीती व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. पोमके फुलणार हद्दीत लाल रंगाचे कापडी बॅनर व पत्रके लावून माओवादी कारवायांचा आभास निर्माण करणाऱ्या आरोपींचा तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेण्यात आला. नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याच्या प्रयत्नाविरोधात गडचिरोली पोलीस दलाने सलग दुसऱ्यांदा कठोर कारवाई केली आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण अभियानामुळे जिल्ह्यातील माओवादी चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे माओवाद्यांची दहशत मोडून काढण्यात आली असून, पोलीस अभिलेखावर जिल्ह्यात एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
२५ जुलै २०२६ रोजी पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचा बनाव करून बॅनर व पत्रके टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्याच दिवशी पोमके फुलणार हद्दीतही काही अज्ञात व्यक्तींनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने लाल रंगाचे बॅनर आणि पत्रके लावल्याचे आढळून आले. या घटनेची गंभीर दखल घेत गडचिरोली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोमके फुलणारपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील हिद्दूर–दोबूर मार्गावर दोन झाडांदरम्यान लाल रंगाचे कापडी बॅनर व पांढऱ्या कागदावरील पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरील मजकूर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा असल्याने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके कार्यरत करण्यात आली.
या प्रकरणी पोस्टे कोठी येथे अपराध क्रमांक ०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(१)(ब), १८९(२), १९०, ६१(२), बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १३, २०, ३९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी
जोगा रैनू धुर्वा (४०), रा. मिरगुळवंचा
मालू कांडे धुर्वा (४२), रा. मिरगुळवंचा
दलसू मर्रा तेलामी (५०), रा. कृष्णार
चैतू डुंगा धुर्वा (५३), रा. दोबूर
गणेश देवू आलामी (४०), रा. पोयारकोठी
राजेश दल्लू वड्डे (३२), रा. मिरगुळवंचा
सर्व आरोपी भामरागड तालुक्यातील रहिवासी असून, त्यांनी माओवादी असल्याचा बनाव करून नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बॅनर व पत्रके लावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच नागरिकांनी नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरविण्यात येणाऱ्या अफवा, धमक्या अथवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले.
“नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये. माओवादाच्या नावाखाली भीती व दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिला.
📰 त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
दिनांक : २९/०७/२०२६
UDYAM-MH-10-0029310
