रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
Triveni News Express
३०: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ३० जुलै) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे सावनेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांची नावे निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४०) व योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७), रा. सावनेर, ता. सावनेर, जि. नागपूर अशी आहेत. रेल्वेची धडक इतकी भीषण होती की दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.
ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अपघात की अन्य काही कारण, याचा सर्व बाजूंनी तपास सावनेर पोलीस प्रशासनाकडून प्रत्यक्षदर्शींचे जबाब तसेच घटनास्थळावरील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सुरू आहे.
घटनेची माहिती अंकित हांडे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. त्यानंतर सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना तातडीने माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्याने फिरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहेत.
