मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्हा हादरला; नदी-नाले दुथडी भरून वाहत, अनेक गावांचा संपर्क तुटला
प्रतिनिधी | गिरीश नरोटे| गडचिरोली
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या व नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मार्दा–राजोली (पोटेगाव) परिसरासह विविध भागांमध्ये नदी-नाल्यांवरील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे धोकादायक बनले असून अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे. अत्यावश्यक सेवा, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा तसेच दैनंदिन व्यवहारांवर याचा मोठा परिणाम होत आहे.
प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त रस्ते व पुलांवरून प्रवास टाळावा तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
पाऊस कायम राहिल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
