मुलचेरा तालुक्यात समस्यांचा डोंगर; रामायपेटा नळयोजना ६-७ वर्षांपासून बंद, रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहतूक विस्कळीत
प्रतिनिधी | गिरीश नरोटे | मुलचेरा
मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) अंतर्गत मौजा रामायपेटा येथे मूलभूत सुविधांचा अभाव आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रामायपेटा गावाच्या मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळून पडले असून आजपर्यंत ते हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे आलापल्ली–मुलचेरा मार्गावरील बोटलाचेरू गावाजवळही मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
याशिवाय, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना (२०१७-१८) आणि जल जीवन मिशन अंतर्गत गावात घराघरांत नळजोडणी करण्यात आली. मात्र गेल्या ६ ते ७ वर्षांपासून ही नळयोजना पूर्णपणे बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली योजना आजही नागरिकांच्या कोणत्याही उपयोगाची ठरत नसल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत ग्रामसेवक श्री. यादव गुळे यांना अनेक वेळा तोंडी माहिती देण्यात आली. तसेच २५ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दूरध्वनीवर संपर्क साधल्यावर “उद्या पाहणी करतो” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्यांनी गावाला भेट देऊन पाहणी किंवा कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रामायपेटा येथील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर किंवा तलावाच्या परिसरात जावे लागत आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात तलावाजवळ गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेनंतरही संबंधित विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गावातील पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, रामायपेटा व बोटलाचेरू येथील रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित हटवावीत, बंद नळयोजना सुरू करावी तसेच शाळेत स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पेपर ईमेज तयार करा
