एटापल्लीतील काटेवेली मंदिर मार्गावरील पूल जीवघेणा; तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
✍️ तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
📍 एटापल्ली |
एटापल्ली तालुक्यातील प्रसिद्ध काटेवेली मंदिराकडे जाणाऱ्या बिड्री–कोंदावाही मार्गावरील पूल मोठ्या प्रमाणात खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. अहेरी–आलापल्ली–एटापल्ली–जारावंडी–गडचिरोली या महत्त्वाच्या मार्गावरील हा पूल असल्याने दररोज शेकडो लहान-मोठी वाहने तसेच भाविक आणि ग्रामस्थ या मार्गाचा वापर करतात.
विशेष म्हणजे, या पुलाचे बांधकाम अवघ्या दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच पूल खचल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुलाजवळ एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुलाची अवस्था अधिकच गंभीर झाली असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पूल तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी बिड्री, कोंदावाही आणि परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास बिड्री व कोंदावाही येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच या पुलावर भविष्यात कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित कंत्राटदार आणि बांधकाम विभागातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
