रामायपेटा ग्रामस्थांचा संताप अनावर!
६-७ वर्षांपासून नळयोजना बंद; दोन दिवसांपासून रस्त्यावर झाड, शाळेत शौचालयाचा अभाव – प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी | गिरीश नरोटे
मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) अंतर्गत येणाऱ्या मौजा रामायपेटा येथे प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्य रस्त्यावर मोठे झाड आडवे पडून असूनही ते हटविण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना (सन २०१७-१८) तसेच जल जीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळजोडणी करण्यात आली असली, तरी गेल्या ६ ते ७ वर्षांपासून एक थेंबही पाणी नळातून आलेले नाही. कोट्यवधी रुपयांच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्येबाबत ग्रामसेवक श्री. यादव गुळे यांना वारंवार तोंडी कळविण्यात आले. तसेच २५ तारखेला प्रसारमाध्यमांद्वारे बातमी प्रसिद्ध करून आणि दूरध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी “उद्या येऊन पाहणी करतो” असे आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत त्यांनी गावात येऊन ना पाहणी केली, ना चौकशी केली. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, गावातील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत शौचालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तलावाच्या परिसरात शौचास जावे लागते. या दुर्लक्षामुळे गेल्या महिन्यात एका विद्यार्थ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इतकी गंभीर घटना घडूनही संबंधित विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप होत आहे.
“लोकांच्या पैशातून योजना उभारायच्या, पण त्या वर्षानुवर्षे बंद ठेवायच्या, मग अशा योजनांचा उपयोग तरी काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वारंवार ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधींना निवेदने व तक्रारी देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे.
रामायपेटा येथील रस्त्यावरील झाड तातडीने हटवून बंद पडलेली नळयोजना सुरू करावी, शाळेत त्वरित शौचालय उभारावे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
