ब्रेकिंग न्यूज
⚡ जिवंत वीज तारेचा घात; शेतकऱ्याच्या बैलाचा जागीच मृत्यू!
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील दुर्दैवी घटना; महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप, तातडीच्या नुकसानभरपाईची मागणी
✍️ तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
📍 कढोली (ता. कुरखेडा) | दि. 31 जुलै
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे जिवंत तुटलेल्या वीज तारेमुळे एका शेतकऱ्याच्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या निष्काळजी कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तीक वसंत टेभुर्णे यांच्या मालकीचा बैल नेहमीप्रमाणे सती नदीपलीकडील शेत परिसरात चरण्यासाठी सोडण्यात आला होता. यावेळी जमिनीवर पडलेल्या जिवंत वीज तारेचा स्पर्श होताच बैलाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बैलमालकाने तातडीने महावितरण व महसूल विभागाला कळविले. त्यानंतर मंडळ अधिकारी वर्षा किरंगे, तलाठी प्रशांत मेश्राम, पोलीस पाटील राजेंद्र आकरे तसेच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत बैलाची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचा अहवाल तयार केला.
या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच ग्रामीण भागातील तुटलेल्या वीज तारा तातडीने दुरुस्त करून वीज यंत्रणेची नियमित तपासणी करावी, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडू शकतात, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ठळक मुद्दे :
⚡ जिवंत तुटलेल्या वीज तारेचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू.
🐂 मृत बैलाची किंमत अंदाजे ₹४० हजार.
📝 महसूल विभाग व महावितरणकडून पंचनामा.
💰 पीडित शेतकऱ्याला तातडीची नुकसानभरपाई देण्याची मागणी.
⚠️ तुटलेल्या वीज तारा दुरुस्त करून निष्काळजीपणा थांबविण्याची ग्रामस्थांची मागणी.
