भामरागडमध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; पर्लकोटा नदीवरील नवीन पूल तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी
सुगत उराडे | तालुका प्रतिनिधी | भामरागड
गेल्या गुरुवार व शुक्रवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. पर्लकोटा नदीवरील जुना पूल सलग तीन दिवस पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा बाहेरील भागाशी संपर्क पूर्णपणे तुटला आणि नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
पूरामुळे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा सलग तीन दिवस खंडित राहिला. त्याचबरोबर बीएसएनएल, एअरटेल आणि जिओ या तिन्ही मोबाईल सेवा तब्बल दोन दिवस बंद पडल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पूरग्रस्त आणि धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून मदत व बचावकार्य प्रभावीपणे राबविले. शनिवारी पाण्याची पातळी ओसरल्यानंतर मुख्य रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.
मात्र, पर्लकोटा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून रखडले असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हा पूल वेळेत पूर्ण झाला असता, तर पूरकाळातही भामरागडचा संपर्क अखंड राहिला असता. तसेच आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शालेय वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली असती.
यामुळे २०२७ च्या पावसाळ्यापूर्वी पर्लकोटा नदीवरील नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी भामरागड तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा दरवर्षी पावसाळ्यात भामरागडवासीयांना याच समस्यांचा सामना करावा लागणार असल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
