तीन चिमुकल्यांचा सती नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; कुरखेडा तालुक्यावर शोककळा
✍️ सुगत उराडे | तालुका प्रतिनिधी
📍 कुरखेडा | दि. १ ऑगस्ट
कुरखेडा / गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मौजा खेडेगाव येथे शनिवारी (दि. १ ऑगस्ट) दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून खेडेगावावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण सुन्हेर दुधकवर (वय ६ वर्षे), कुनाल नरेश दुधकवर (वय ५ वर्षे) आणि मोहित युवराज सराटे (वय ११ वर्षे) अशी मृत पावलेल्या बालकांची नावे आहेत. हे तिघेही खेडेगाव (ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) येथील रहिवासी होते. शनिवारी दुपारी हे चार बालके सती नदीवर आंघोळीसाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण पाण्यात बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेल्या चौथ्या मुलाने प्रसंगावधान राखत तातडीने काठावर धाव घेऊन स्थानिक नागरिक व मच्छीमारांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. प्राथमिक तपासानुसार तिघांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याचे तहसीलदार, कुरखेडा यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून शोक व्यक्त व नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे, तलाव व इतर जलस्रोतांतील पाणीपातळी धोकादायकरीत्या वाढली असल्याने अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना:
जलस्रोतांपासून दूर राहा: पावसाळ्यात नदी, नाले, तलाव, बंधारे, खाणीतील पाणीसाठे किंवा इतर जलाशयांमध्ये पोहण्यासाठी अथवा आंघोळीसाठी जाऊ नये.
जोखीम पत्करू नका: पुलावरून किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये. पाण्याचा वेग आणि खोलीचा अचूक अंदाज येत नसल्याने जीवितहानीचा धोका वाढतो.
लहान मुलांवर लक्ष ठेवा: पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना जलस्रोतांपासून दूर ठेवावे.
सूचनांचे पालन करा: प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
