प्रेस नोट – सालय्या कंबलवार
मोसम येथील BSNL टॉवर आठवडाभरापासून बंद; ८ ते १० गावांचा संपर्क तुटला
मोबाईल, इंटरनेट, बँकिंग व शासकीय सेवा ठप्प; दोन दिवसांत सेवा सुरू न झाल्यास ‘हल्लाबोल आंदोलन’चा इशारा
प्रतिनिधी | अहेरी | गडचिरोली
अहेरी तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा मोसम येथील BSNL मोबाईल टॉवर गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहेरीपासून सुमारे १९ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी लगत असलेल्या या टॉवरवर परिसरातील ८ ते १० गावांतील हजारो नागरिक अवलंबून असल्याने संपूर्ण परिसरात मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.
मोसम येथे अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या BSNL टॉवरमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक दैनंदिन व्यवहार करत होते. मात्र टॉवर बंद पडल्यामुळे ऑनलाईन बँकिंग, आधार पडताळणी, शासकीय योजनांचे लाभ, स्वस्त धान्य वितरण, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज, विविध दाखले काढणे तसेच शेतकऱ्यांची ऑनलाईन कामे पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन BSNL प्रशासनाने मोसम येथील टॉवरची सेवा युद्धपातळीवर पूर्ववत करावी, अशी मागणी देवलमरी ग्रामपंचायत प्रशासकीय समिती सदस्य तथा रामराम महाराष्ट्र न्यूजचे गडचिरोली प्रतिनिधी सालय्या कंबलवार यांनी केली आहे.
यासोबतच त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “पुढील दोन दिवसांत BSNL सेवा सुरळीत सुरू न झाल्यास अहेरी येथील BSNL कार्यालयावर ‘हल्लाबोल आंदोलन’ छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी BSNL प्रशासनाची राहील.”
शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सालय्या कंबलवार म्हणाले,
“महायुती सरकार डिजिटल इंडियाची घोषणा करत असताना ग्रामीण भागात आठवडाभर मोबाईल नेटवर्कच बंद राहत असेल, तर डिजिटल क्रांतीचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत नेमका कसा पोहोचणार?”
नागरिकांची मागणी
मोसम BSNL टॉवर तातडीने सुरू करावा.
आठवडाभरापासून बंद असलेल्या सेवेचे कारण जाहीर करावे.
भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
अन्यथा तीव्र जनआंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
