पूर ओसरला; प्रशासनाकडून घराघरांत जाऊन पाहणी
नुकसानग्रस्तांना दिलासा; पायाभूत सुविधा पूर्ववत करण्याच्या कामांना गती
✍️ प्रतिनिधी : सुगत उराडे
गडचिरोली | दि. २ ऑगस्ट
भामरागड तालुक्यात मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा व पामुलगौतमी नद्यांना आलेल्या पुराचा धोका आता ओसरला असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पूर ओसरताच प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतकार्याला वेग दिला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत आणि तहसीलदार किशोर बागडे यांनी पूरग्रस्त वस्त्यांमध्ये घराघरांत जाऊन नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूरामुळे घरांसह जीवनावश्यक साहित्याचे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेत नागरिकांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पूरामुळे बाधित झालेल्या पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून नुकसानाचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. रस्ते, वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी तातडीने कामे हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून असून नुकसानीचे पंचनामे, मदत वितरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक माहिती द्यावी तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
