ब्रेकिंग न्यूज
अहेरी तालुक्यातील चकिनगट्टा गाव तीन दिवसांपासून अंधारात; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
✍️ प्रतिनिधी | गिरीश नरोटे
अहेरी | दि. ३ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मौजा चकिनगट्टा हे गाव मुख्यालयापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असून, गेल्या तीन दिवसांपासून गावाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होत आहे. दिवसभर शेतात कष्ट करून घरी परतलेल्या शेतकऱ्यांना अंधारातच वेळ घालवावा लागत आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून मोबाईल चार्जिंग, पिण्याचे पाणी आणि इतर दैनंदिन कामेही ठप्प झाली आहेत.
ग्रामस्थांनी महावितरण (एमएसईबी) प्रशासनाकडे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, तात्काळ वीजपुरवठा सुरू न झाल्यास शेतीची कामे बाजूला ठेवून महावितरण कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
“पावसाळ्यातील तीन दिवसांचा अंधार हा केवळ गैरसोय नसून ग्रामीण नागरिकांच्या जीवनाशी खेळ आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा,” अशी मागणी चकिनगट्टा ग्रामस्थांनी केली आहे.
