एटापल्ली तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप,कारवाईची मागणी
प्रतिनिधी | एटापल्ली | गिरीश नरोटे
दि. ६ ऑगस्ट २०२६
एटापल्ली तहसील कार्यालयात दररोज विविध शासकीय कामांसाठी शेकडो नागरिकांची वर्दळ असते. मात्र या कार्यालयातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय व आरोग्यासाठी धोकादायक बनली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता काढलेल्या छायाचित्रांमधून स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल झाल्याचे दिसून येत आहे.
छायाचित्रांमध्ये भारतीय पद्धतीच्या स्वच्छतागृहात फरशीवर घाण, दुर्गंधी, साचलेले पाणी तसेच भिंती व सीटवर मळ साचलेला दिसून येतो. मुतारी परिसरातही घाण, गंज, दुर्गंधी आणि पाण्याअभावी साफसफाई होत नसल्याचे स्पष्टपणे दिसते. पाण्याचा निचरा व्यवस्थित नसल्याने आणि टाक्या, नळ यांची देखभाल न झाल्याने संपूर्ण स्वच्छतागृह वापरण्यास अयोग्य झाले आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, शासकीय कार्यालयातीलच स्वच्छतेची अशी दयनीय अवस्था प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विशेषतः वृद्ध, महिला, दिव्यांग तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना या अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, साथीच्या रोगांचा धोकाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी तहसील प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
स्वच्छतागृहांची तात्काळ सखोल स्वच्छता करण्यात यावी.
दैनंदिन साफसफाईसाठी जबाबदार कर्मचारी किंवा ठेकेदाराची नियुक्ती करावी.
पाणीपुरवठा, नळ व निचरा व्यवस्था त्वरित दुरुस्त करावी.
दर १५ दिवसांनी स्वच्छतेचा अहवाल सार्वजनिक फलकावर प्रसिद्ध करावा.
यासोबतच, शासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांनी ७ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
