सिरोंचा दौऱ्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन
प्रतिनिधी | सिरोंचा | दि. ६ ऑगस्ट २०२६
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी गुरुवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा करून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध आघाड्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये ललिता शंकर चल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष, पद्मा भगवान पिल्ली यांची शहराध्यक्षा, तर सपना समय्या तोकला यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोलनुरी, नगराध्यक्ष पद्मा बोगे, नगरउपाध्यक्ष बबलूअ पाशा, नगरसेवक नरेश आलोने, सतीश बोगे, सतिश राचर्ला, जगदीश रालाबंडी, कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानया जनगाम, तालुका शहराध्यक्ष रवी सुलतान, महिला जिल्हा उपाध्यक्षा व्यंकटलक्ष्मी आरवेली यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून, “आपसी मतभेद विसरून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकदिलाने काम करा. पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवावी,” असे आवाहन केले.
तसेच मा. सारिका गडपल्ली, अहेरी महिला तालुकाध्यक्ष व कार्यकारी अध्यक्षा यांनीही उपस्थित महिलांना आणि युवतींना संबोधित करत, “महिला व युवतींनी एकजुटीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करावे. गावागावात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.
या दौऱ्यामुळे सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला चालना मिळणार असून, आगामी राजकीय व सामाजिक उपक्रमांच्या नियोजनाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
