बुर्गी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना अभिवादन; जल-जंगल-जमीन व संविधानिक हक्कांसाठी एकजुटीचा संकल्प
प्रतिनिधी : सुगत उराडे
मौजा बुर्गी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली | दि. ९ ऑगस्ट २०२६
एटापल्ली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मौजा बुर्गी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. वीर बाबुराव शेडमाके चौकात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाची अस्मिता, हक्क, संस्कृती आणि विकासाचे प्रश्न यावर प्रकाश टाकला. ९ ऑगस्ट हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून, आदिवासी समाजाच्या संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी नव्याने संकल्प करण्याचा दिवस असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
जल, जंगल आणि जमीन, स्वशासन, शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच सामाजिक व आर्थिक न्याय या मूलभूत प्रश्नांसाठी आदिवासी समाजाने अधिक जागरूक, संघटित आणि सक्षम होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि बोलीभाषा यांचे जतन करताना आधुनिक शिक्षण व विकासाची कास धरणे आवश्यक आहे. अधिकारांसोबतच सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून ग्रामसभा, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे, असेही मान्यवरांनी सांगितले.
मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमाला गोसुजी हिचामी (गाव पाटील, बुर्गी), विनोद हिचामी (सामाजिक कार्यकर्ते), लुलाजी हिचामी (भूमिया), जाधव साहेब (PSI, पोलीस मदत केंद्र बुर्गी), बोरुले सर (प्रा.मु. भगवंतराव आश्रमशाळा, बुर्गी), मल्लाजी गावडे, मधुकर पुंगाटी, सीनू बिरमवार, साई पुंगाटी, राजू माहा, बिरमवार सर, अमराज पुंगाटी, अशोक हिचामी, रमेश गावडे, दलसू माहा, विनोद दुर्गे, उमेश गावडे, इसू माहा, सुगत उराडे, रमेश हिचामी, शंकर तलांडी, शिवनाथ लकडा, मनोज सरकार, सुरेश पुंगाटी यांच्यासह बुर्गी गावातील आदिवासी समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे बुर्गी परिसरात आदिवासी एकता, सामाजिक बांधिलकी, हक्कांची जाणीव आणि संविधानिक मूल्यांचा जागर निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जय सेवा!
जय बिरसा!
जय आदिवासी!
जय संविधान!
