पेरमिलीत आदिवासी संस्कृतीचा जल्लोष!
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली; पारंपरिक रेला नृत्य, वेशभूषा अन् ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला
पेरमिली | प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचा भव्य जल्लोष पाहायला मिळाला. पेरमिली इलाका पट्टीतील सर्व ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक रेला नृत्य, आदिवासी वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि सांस्कृतिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या रॅलीत युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली ताई आत्राम यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सहभागी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
रॅलीमध्ये परिसरातील आदिवासी बांधव, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी आपल्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे आणि परंपरांचे दर्शन घडविले.
परंपरा जपत विकासाचा संकल्प
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती, परंपरा आणि एकजूट अधोरेखित करण्यात आली. नव्या पिढीने आपल्या पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक विकास आणि हक्कांच्या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
पेरमिलीतील या भव्य रॅलीमुळे आदिवासी संस्कृतीचे वैभव आणि समाजाची एकजूट ठळकपणे दिसून आली.
