जिवनगट्टा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
सप्तरंगी ध्वज फडकवत बिरसा मुंडा चौक ते वीर बाबुराव शेडमाके चौकापर्यंत भव्य रॅली; आदिवासी अस्मिता, संस्कृती व हक्कांचा जागर
एटापल्ली | प्रतिनिधी गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मौजा जिवनगट्टा येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची गौरवशाली संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि महान क्रांतिकारकांच्या विचारांचा जागर या कार्यक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वंदना ताई गावडे, तर उपाध्यक्ष म्हणून सौ. सरिता ताई गावडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष सौ. वंदना ताई गावडे यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, तंट्या भील आणि कुपार लिंगो यांसारख्या आदिवासी समाजातील महान व्यक्तींच्या जयघोषात उत्साहपूर्ण रॅली काढण्यात आली.
ही रॅली बिरसा मुंडा चौक ते वीर बाबुराव शेडमाके चौक या मार्गावर काढण्यात आली. पारंपरिक घोषवाक्ये, जयघोष आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील श्री. संभाजी हिचामी, गाव भूमिया श्री. फकरीजी हिचामी, तसेच प्रमुख पाहुण्या सौ. बेबी ताई नरोटी, माजी सभापती पंचायत समिती एटापल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. उमेश नरोटी, भामरागड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून आदिवासी समाजातील महान व्यक्तिमत्त्वांचे जीवनकार्य आणि विचार यांची माहिती दिली. वीर बाबुराव शेडमाके कोण होते, त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेला संघर्ष काय होता, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी केलेले कार्य काय होते, यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
यावेळी आदिवासी समाजाच्या आचार-विचार, मूलतत्त्वे, रूढी-परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि जल-जंगल-जमीनशी असलेले नाते याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी समाज हा या भूमीचा प्राचीन मूळनिवासी समाज असून त्याची स्वतंत्र संस्कृती, परंपरा आणि ओळख जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यामागील उद्देश, आदिवासींचे हक्क, अस्तित्व, संस्कृती आणि पुढील पिढीपर्यंत परंपरांचे संवर्धन करण्याचे महत्त्व यावरही प्रा. उमेश नरोटी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालक श्री. किसन हिचामी, नगरसेवक, नगरपंचायत एटापल्ली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन श्री. पुरुषोत्तम हिचामी यांनी केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. देवाजी दादा अरमा, श्री. रविंद्र भाऊ नरोटी, श्री. मनिराम इस्टम, श्री. संतोष भाऊ मडवी, श्री. देवनाथ गावडे, श्री. अशोक गावडे, श्री. विनायक गावडे, श्री. सुधाकर भाऊ नरोटी, श्री. राम भाऊ नरोटी यांच्यासह श्री. रेजी पदा, श्री. विनोद मटटामी, श्री. राकेश आलामी, सौ. सिंधू ताई हिचामी, सौ. मंगला ताई नरोटी, सौ. सायत्री आलामी ताई, सौ. सुनिता ताई नरोटी, सौ. आनंदी ताई नरोटी तसेच गावातील महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी अस्मिता, संस्कृती आणि महापुरुषांच्या विचारांचा जयघोष करत जिवनगट्ट्यातील जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
