पैमा गावात नाल्यांची दुर्दशा; सडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा विळखा!
जंग लागलेल्या धोकादायक विद्युत खांबांकडेही दुर्लक्ष; ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप
एटापल्ली प्रतिनिधी | गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत बुर्गी अंतर्गत येणारे पैमा गाव मुख्यालयापासून तब्बल २१ किलोमीटर अंतरावर असून, गेल्या काही वर्षांपासून गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील नाल्यांची साफसफाई न झाल्याने नाल्यांमध्ये गाळ, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच सडलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गावातील नाल्यांची नियमित साफसफाई करणे आवश्यक असताना गेल्या काही वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्यामुळे पावसाळ्यात नाली तुंबण्याची शक्यता असून, साचलेल्या घाणीमुळे गावातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जंग लागलेल्या विद्युत खांबांमुळे सुरक्षेचा प्रश्न
पैमा गावातील अनेक विद्युत खांबांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गंज लागला असून, काही खांबांना छिद्रे पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे विद्युत खांब कमकुवत झाले असून, भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या एटापल्ली कार्यालयाला तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार माहिती दिल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्यापही संबंधित विद्युत खांब बदलण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामसेविका व सरपंचांनी लक्ष द्यावे, ग्रामस्थांची मागणी
ग्रामपंचायत बुर्गीच्या ग्रामसेविका सौ. दुर्वे मॅडम आणि सरपंच गणेश गावडे यांनी पैमा गावातील समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील नाल्यांमधील गाळ व कचरा तातडीने साफ करावा, नियमित नालीसफाईची व्यवस्था करावी तसेच धोकादायक अवस्थेतील जुने विद्युत खांब तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील मूलभूत प्रश्नांकडे वारंवार निवेदन व तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असेल, तर संबंधित विभागांनी याची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पैमा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
