जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या सर्पदंश मृत्यूची गंभीर दखल
आदिवासी विकास परिषद व SC/ST विकास परिषद पदाधिकाऱ्यांची सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांशी भेट; आश्रमशाळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
गडचिरोली | प्रतिनिधी गिरीश नरोटे
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हा अत्यंत गंभीर व चिंताजनक प्रकार असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोली तसेच अखिल भारतीय SC/ST विकास परिषद, गडचिरोली यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वाजिद शेख यांची भेट घेऊन जपतलाई घटनेसह जिल्ह्यातील शासकीय व खासगी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा केली.
जपतलाई येथील घटनेची गंभीर दखल घेत आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी आश्रमशाळांची नियमित तपासणी, सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केली.
मूलभूत सुविधांवरही प्रशासनाचे लक्ष आवश्यक
शासकीय तसेच खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि शाळा परिसरातील सुरक्षाव्यवस्था याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने आश्रमशाळांची नियमित पाहणी करून त्रुटी आढळल्यास तातडीने त्या दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आश्रमशाळांमध्ये सुविधांची कमतरता किंवा सुरक्षेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी भूमिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
दोषींवर कारवाईची मागणी
जपतलाई येथील सर्पदंश मृत्यू प्रकरणाची योग्य व निष्पक्ष चौकशी करून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या भेटीदरम्यान SC/ST विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, डॉ. तारा वलके, अजय कुकुडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
