सिरोंचा शासकीय आश्रमशाळेतील गैरव्यवस्थेचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी
प्रतिनिधी :
सिरोंचा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील व्यवस्थेबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा तसेच विद्यार्थ्यांची अवस्था बिकट असल्याचा आरोप समाजसेवक श्री. जयंत माडवे यांनी केला आहे.
माडवे यांच्या आरोपानुसार, कंत्राटदारामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या काही अस्थायी कर्मचाऱ्यांना आश्रमशाळेतील शासकीय निवासस्थाने राहण्यासाठी देण्यात आली आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा अधिकार कोणाला आहे, तसेच या निवासव्यवस्थेमागील नेमका उद्देश काय आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अतिरिक्त कार्यभार सांभाळत असल्याचीही माहिती समोर येत असून, त्यांच्या कार्यकाळातील निवासव्यवस्था, विद्यार्थ्यांना दिले जाणारे भोजन आणि शाळेतील एकूण व्यवस्थापनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“तालुकास्तरावरील शासकीय आश्रमशाळेची अशी परिस्थिती असेल तर दुर्गम गावांतील आश्रमशाळांची अवस्था काय असेल, हा गंभीर प्रश्न आहे,” असा सवाल श्री. जयंत माडवे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या सर्व आरोपांची वस्तुस्थिती तपासण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
