कोठी–कोरणार पूल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
गडचिरोली | प्रतिनिधी : मधुकर गोंगले
एटापल्ली तालुक्यातील कोठी–कोरणार येथील बांडीया नदीवरील पूल अवघ्या तीन वर्षांत कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने केली आहे.
या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील पुलाचे भूमिपूजन १५ ऑगस्ट २०२३ रोजी झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पुलाचे पिलर खचून पूल कोसळल्याने बांधकामातील गुणवत्ता, तांत्रिक देखरेख आणि वापरण्यात आलेल्या साहित्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निवेदनानुसार, पुलाचे बांधकाम सुरू असताना पुलियाचे डिझाइन बदलण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते व पुलांची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत कोठी–कोरणार पूल अल्पावधीतच कोसळल्याने सुरू असलेल्या इतर कामांच्या गुणवत्तेचीही स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच दोषी व्यक्तींच्या कथित बेकायदेशीर मालमत्तेचीही चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले, जिल्हा सल्लागार भीमराव वनकर, जिल्हा सचिव फुलचंद वाघाडे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, चौकशीनंतरच आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
