नागपूर रोडवर भीषण अपघात: ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू
तीन वर्षांच्या चिमुकलीसह वडिलांचा दुर्दैवी अंत; बोंडाळा परिसरात शोककळ
तीन वर्षांच्या चिमुकलीसह वडिलांचा दुर्दैवी अंत; बोंडाळा परिसरात शोककळा
प्रतिनिधी : सुगत उराडे
मूल (दि. १२ ऑगस्ट २०२६):
नागपूर रोडवरील लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. बाजार आटोपून दुचाकीने आपल्या गावी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत वडील आणि त्यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
राहुल नारायण पाल (वय ३५ वर्षे) आणि ईशा राहुल पाल (वय ३ वर्षे, रा. बोंडाळा भूज) अशी मृत बाप-लेकीची नावे आहेत.
बाजार करून घरी परतताना काळाचा घाला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल पाल हे आपल्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन दुचाकीने बाजार करण्यासाठी मूल येथे आले होते. सायंकाळी बाजार आटोपून ते आपल्या बोंडाळा (भूज) या गावी परत जात असताना लक्ष्मीनारायण राईस मिलजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, राहुल व चिमुकली ईशा हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने उपचाराची संधी मिळण्यापूर्वीच दोघांचीही प्राणज्योत मालवली.
गावावर पसरली शोककळा
अपघाताची बातमी समजताच मूल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेसह वडिलांचा असा अचानक मृत्यू झाल्याचे समजताच पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बोंडाळा परिसरासह संपूर्ण मूल तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
