वनहक्क दावेदारांच्या जमिनीची GPS नकाशाद्वारे मोजणी करा
सिरोंचा तालुक्यातील सोमणूर माल येथील वनहक्क समिती अध्यक्षांची वनविभागाकडे मागणी
सिरोंचा : तालुक्यातील सोमणूर माल, ता. सिरोंचा येथील वनहक्क दावेदारांच्या प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी त्यांच्या जमिनीची GPS नकाशाद्वारे मोजणी करून आवश्यक कागदपत्रे व अहवाल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी लक्ष्मण पेंट्या कुरसम, अध्यक्ष, वनहक्क समिती सोमणूर माल यांनी वनविभागाकडे केली आहे.
याबाबत वनरक्षक (सोमणूर माल), वनपाल (असरअल्ली) तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी असरअल्ली यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात सोमणूर माल गावातील वनहक्क दावेदारांच्या जमिनींची GPS नकाशाच्या आधारे प्रत्यक्ष मोजणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वनहक्क दावेदारांचे दावे पुढील कार्यवाहीसाठी प्राप्त झाले असून, संबंधित जमिनींची अचूक मोजणी व सीमांकन होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने कार्यवाही करून GPS नकाशाद्वारे मोजणी, मोजमाप पंचनामा तसेच वनहक्क अहवालाचे नमुना ‘अ’ व ‘ब’ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
वनहक्क कायद्यानुसार पात्र दावेदारांना त्यांच्या हक्काची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि कागदपत्रांच्या अभावामुळे दावे प्रलंबित राहू नयेत, यासाठी संबंधित विभागाने तातडीने मोजणी करून अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा वनहक्क समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
— लक्ष्मण पेंट्या कुरसम
अध्यक्ष, वनहक्क समिती, सोमणूर माल
ता. सिरोंचा, जि. गडचिरोली
