जांबिया शासकीय आश्रमशाळेतील सुविधांबाबत प्रशासनाचा खुलासा
१७७ निवासी विद्यार्थ्यांसाठी ९० बंक बेड उपलब्ध; पिण्याच्या पाण्यासाठी दोन आरओ प्लांट कार्यरत
तालुका प्रतिनिधी : गिरीष नरोटे
गडचिरोली, दि. १४ : एटापल्ली तालुक्यातील जांबिया येथील शासकीय आश्रमशाळेबाबत दि. १४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील काही दाव्यांबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड प्रशासनाने खुलासा केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बेड उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांटची सुविधाही कार्यरत असल्याचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, जांबिया शासकीय आश्रमशाळा सध्या नवीन इमारतीत सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नवीन वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरू असून, सध्या मुलांचे वसतिगृह शाळेच्या इमारतीत तर मुलींचे वसतिगृह नवीन इमारतीत सुरू आहे.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत एकूण १७७ विद्यार्थी निवासी आहेत. यामध्ये ८३ मुले आणि ९४ मुलींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी ९० बंक बेड उपलब्ध असून, प्रत्येक बंक बेडची दोन विद्यार्थ्यांची क्षमता असल्याने एकूण १८० विद्यार्थ्यांची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या निवासी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत बेडची पुरेशी व्यवस्था असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शाळेच्या जुन्या इमारतीत १०० खाटांची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर शाळा नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्याने आवश्यकतेनुसार बंक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जुन्या मागणीपत्राचा संदर्भ सध्याच्या परिस्थितीशी जोडणे योग्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शाळेत दोन आरओ वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले असून ते कार्यरत असल्याचेही प्रशासनाने सांगितले.
शाळेतील अधीक्षकाचे पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे संबंधित जबाबदारी शिक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच स्त्री अधीक्षक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागविण्यात आले असून पात्र उमेदवाराची निवड झाल्यानंतर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वृत्तातील आरोप आणि प्रशासनाचा खुलासा यामुळे जांबिया आश्रमशाळेतील प्रत्यक्ष परिस्थितीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
