वांगेपल्ली निवासी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
गडचिरोली प्रतिनिधी – सालय्या कंबलवार
वांगेपल्ली येथील सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन तथा समाज कल्याण विभाग, गडचिरोली अंतर्गत निवासी शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका डांगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर निवासी शाळेपासून मुलींच्या वसतिगृहापर्यंत बँडच्या तालावर देशभक्तीपर रॅली काढण्यात आली. वसतिगृहातही मुख्याध्यापिका प्रियंका डांगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाला व्यसनमुक्ती तालुका समन्वयक मा. नंदिनी आशा, देवलमरी ग्रामपंचायत सदस्य तथा गडचिरोली जिल्हा राम राम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मा. सालय्या कंबलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षक सीमा वनकर, विद्या दहागावकर, श्वेता येगलोपवार, सुप्रिया अलम, यश पडालवार, उमेश मडावी, शिरिन येमुलवार व सुरज येमुलवार यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापिका प्रियंका डांगेवार व सालय्या कंबलवार यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तसेच भाषण स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलेश कोटा यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्या दहागावकर यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
