सिरोंचा नगर पंचायत प्रभाग क्रमांक १३ मधील सुर्यारावपल्ली शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या सुर्यारावपल्ली येथील जिल्हा परिषद मुला-मुलींच्या शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शालेय समितीचे सदस्य चंदू आकुदारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर निवासी शाळेपासून विद्यार्थी-विद्यार्थिनींची देशभक्तीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी सुर्यारावपल्ली परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. भुमय्या व श्रीमती कमला सुंदीला यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावातील युवा वर्गातील रवि सुंदीला, किरण, श्रीकांत दुर्गम, महेश गोगु, राजबापू सुंदीला व संतोष मलकुरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ. ममता ताडबोईना यांनी केले, तर श्री. तन्नीर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
देशभक्तीपर वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
