गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; दोन प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
विशेष प्रतिनिधी :- सुगत उराठे
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांना उधाण आले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाल्यांवरील कमी उंचीच्या पुलांवरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाल्याने आज, रविवारी (२३ ऑगस्ट) जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे वाहतूक मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
बंद झालेले मार्ग:
कोरची–बोटेकसा राज्य महामार्ग क्र. ३१४: कोरची तालुक्यातील भिमपूर नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
काढोली–उराडी प्रजिमा क्र. ७: कुरखेडा तालुक्यातील या प्रमुख जिल्हा मार्गावरूनही पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या मार्गांवरून प्रवास न करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
तालुकानिहाय पावसाची नोंद:
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून सर्वाधिक पावसाची नोंद कोरची तालुक्यातील बेडगाव महसूल मंडळात ७९.४ मिमी झाली आहे.
मुलचेरा: ७८.२ मिमी
कोरची: ७१.६ मिमी
मसेली: ६८.० मिमी
प्रशासनाचा इशारा:
सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू असल्याने इतरही काही नाले व पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय पूरग्रस्त भागातून प्रवास टाळावा आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व आपत्कालीन सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
