अवैध दारूविरोधात गडचिरोली पोलिसांचा धडाका
५.४० लाखांचा मोहफुलाचा सडवा नष्ट; येलचिल पोलिसांची चार ठिकाणी धाड
प्रतिनिधी : सुगत उराडे
| २१ ऑगस्ट २०२६
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करत येलचिल पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर मोठी कारवाई केली. नवेगाव व वेलगुर टोला परिसरातील शेतशिवारात चार ठिकाणी धाड टाकून ५,४०० लिटर मोहफुलाचा सडवा आणि हातभट्टी साहित्य असा ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे २० ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चार ठिकाणी अनुक्रमे ८००, १,०००, २,००० आणि १,६०० लिटर सडवा जप्त करण्यात आला. पंचांसमक्ष तयार दारू, ड्रम व हातभट्टी साहित्यही नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी मारोती मोहुर्ले, शंकर सोनूले, शंकर आत्राम आणि तिरुपती दुलम यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी धनाजी शिंदे, अशोक बांगर आणि येलचिल पोलिस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
