अहेरीपासून अवघ्या ७ किमीवर इंदारामचा विकास ठप्प! ग्रामसेवक मस्त, जनता त्रस्त
वार्ड क्रमांक ३ मधील रस्ता दोन वर्षांपासून दुरवस्थेत; पावसाळ्यात दीड फुटापर्यंत पाणी, प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप
अहेरी : अहेरी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदाराम गावातील वार्ड क्रमांक ३ मधील रस्त्याची दयनीय अवस्था प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांना अक्षरशः तडा देणारी ठरत आहे. मागील दोन वर्षांपासून रस्ता दुरुस्तीअभावी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असून, पावसाळ्यात या रस्त्यावर तब्बल एक ते दीड फूट पाणी वाहत असल्याने ‘रस्ता कुठे आणि पाण्याचा प्रवाह कुठे?’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामसेवकांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष?
रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नाली अथवा आवश्यक व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामसेवकांकडे केली. तोंडी सूचना देण्यासोबतच निवेदनेही देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाण्यातून वाट काढताना जीव मुठीत!
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यातून मार्गक्रमण करताना घसरणे अथवा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला हा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित असतानाही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
‘ग्रामसेवकांना वारंवार सांगूनही समस्या सुटत नसेल, तर दाद मागायची कुठे?’
असा संतप्त सवाल वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अहेरीच्या अगदी उंबरठ्यावर विकासाची अशी अवस्था का?
अहेरी मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील मूलभूत रस्त्याची ही अवस्था असेल, तर दुर्गम भागातील विकासकामांची परिस्थिती काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. शासनाकडून गावागावांत विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असताना, प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत समस्या मात्र कायम असल्याचे चित्र इंदाराममध्ये दिसत आहे.
शासनप्रशासनाची झोप उडवणारा सवाल
ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्यास संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित कोणाची? दोन वर्षांपासून रस्त्याची समस्या कायम असताना पाहणी व दुरुस्ती का झाली नाही? पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने वार्ड क्रमांक ३ मधील रस्त्याची पाहणी करून पाण्याचा निचरा, रस्त्याची दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामसेवक मस्त, जनता त्रस्त आणि विकास मात्र कागदावरच?
इंदाराममधील या गंभीर समस्येकडे आता अहेरी पंचायत समिती, तहसील प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
