खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण व रक्तदान शिबिर
गडचिरोली गिरीश नरोटे
गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी, १९ जुलै रोजी गडचिरोली येथे मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रम आणि भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला युवक-युवतींसह नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
खासदार डॉ. किरसान यांचा वाढदिवस १४ जुलै रोजी होता. मात्र, स्पर्धा परीक्षेची उच्च दर्जाची पुस्तके पुण्यावरून वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याने १४ जुलैचा हा कार्यक्रम पुढे ढकलून १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला. स्वतः एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षांच्या प्रक्रियेतून जाऊन यश संपादन केलेल्या डॉ. किरसान यांनी ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे परिश्रम, दुःखे व अडचणी लक्षात घेऊन या उपक्रमाचे आयोजन केले. गडचिरोली जिल्ह्यात लोकप्रतिनिधींकडून थेट अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे विनामूल्य वाटप होण्याचा हा पहिलाच उपक्रम ठरला आहे.
कार्यक्रमाला पूर्वनोंदणी केलेले अनेक युवक-युवती सकाळी ९.०० वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वितरण करून त्यांना भविष्यातील परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शक साहित्य पुरवण्यात आले.
याच सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भव्य रक्तदान शिबिरही पार पडले, ज्यामध्ये परिसरातील युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार डॉ. नामदेव कीरसान मित्रपरिवार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता.
