इंद्रावतीच्या पुरामुळे भामरागडचा संपर्क तुटला!
दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; आलापल्ली–भामरागड मार्ग बंद, नागरिकांची मोठी गैरसोय
भामरागड | गिरीश नरोटे
सोमवार, २४ ऑगस्ट २०२६
भामरागड तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती गंभीर झाली असून, मौजा भामरागड परिसरातून वाहणाऱ्या इंद्रावती नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नागरिकांच्या ये-जा करण्यावर मोठा परिणाम झाला आहे.
पूरस्थितीमुळे आलापल्ली–भामरागड मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली असून, भामरागड तालुक्यातील नागरिकांचा तालुक्याच्या ठिकाणाशी संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयीन कामे, आरोग्यसेवा, शिक्षण, बाजारपेठ तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी भामरागड येथे यावे लागते. मात्र मार्ग बंद झाल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
नागरिकांचा सवाल — कायमस्वरूपी उपाय कधी?
दरवर्षी पावसाळ्यात भामरागड परिसरात पूरस्थिती निर्माण होते. रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे फक्त विकासाच्या घोषणा करून चालणार नाही; प्रत्यक्षात सुरक्षित आणि बारमाही संपर्क व्यवस्था उभी करण्याची गरज आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पूर आला की रस्ता बंद, वाहतूक ठप्प आणि नागरिकांची गैरसोय — हे चित्र वारंवार का पाहायला मिळते? विकासाच्या नावाखाली जनतेशी खेळ किती दिवस सुरू राहणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
सध्याची पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या भागातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच आलापल्ली–भामरागड मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यात अशा परिस्थितीत संपर्क तुटणार नाही यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधांचा ठोस आराखडा करण्याची मागणी जोर धरत आहे.
भामरागडच्या जनतेला आश्वासन नव्हे, तर सुरक्षित रस्ता आणि कायमस्वरूपी संपर्क हवा आहे!
