आदिवासी विद्यार्थी आंदोलनात माजी आमदारांची कोंडी; प्रश्नांच्या भडिमारानंतर काढता पाया
प्रतिनिधी : सुगत उराडे | २४ ऑगस्ट २०२६
नागपूर : शासनाच्या निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलेले भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना विद्यार्थ्यांच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले.
विविध मागण्यांबाबत विद्यार्थ्यांनी डॉ. होळी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका आणि घोषणांमुळे काही काळ आंदोलनस्थळी वातावरण तापले. डॉ. होळी यांनी हात जोडून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र विद्यार्थ्यांचा रोष कायम राहिल्याने अखेर त्यांनी आंदोलनस्थळावरून निघून जाणे पसंत केले.
यावेळी काही संतप्त विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाशी संबंधित त्यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले. विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भूमिकेबाबत तीव्र शब्दांत टीका करण्यात आली.
शासनाने संबंधित निर्णय मागे घ्यावा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप येण्याची शक्यता असून, शासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
