चामोर्शीतील प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू; सखोल चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून समिती गठीत
चामोर्शी :- श्री फरकडे प्रतिनिधी
चामोर्शी येथील प्रसूतीदरम्यान माता आणि बालकाच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाला का किंवा नेमका काय घटनाक्रम घडला, याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीतील निष्कर्षांनुसार दोषींवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
घटनाक्रम:
२३ ऑगस्ट, सकाळी ५:०० वा. – चामोर्शी येथील रहिवासी सौ. जिजा हंसराज सातार (वय २७) यांना प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत प्रसूती तेथेच शक्य असल्याचे सांगण्यात आले.
सकाळी ९:०० वा. – पुढील तपासणीदरम्यान स्वाभाविक प्रसूतीत अडचण येत असल्याचे आणि गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मंदावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
सकाळी ११:०० वा. – गुंतागुंत वाढल्याने रुग्णाला वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेच्या देखरेखीत रुग्णवाहिकेने महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे हलवण्यात आले.
प्रसूती व बाळाचा मृत्यू: गडचिरोली येथे तपासणी केली असता बाळाचे डोके अडकल्याची गंभीर स्थिती आढळली. तातडीने उपचार करून प्रसूती करण्यात आली, मात्र बाळ मृतावस्थेत जन्माला आले.
मातेची खालावलेली प्रकृती: प्रसूतीनंतर मातेला तीव्र अतिरक्तस्राव (PPH) सुरू झाला. त्यांना तातडीने रक्त आणि ४ युनिट फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा (FFP) देण्यात आले.
सायंकाळी ७:३० वा. – प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने रुग्णाला इंट्यूबेशन करून सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलवण्यात आले.
रात्री ९:५० वा. – तज्ज्ञांच्या उपस्थितीत सोनोग्राफी व आवश्यक उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान मातेची प्राणज्योत मालवली.
निष्कर्षांनुसार पुढील कारवाई होणार
या संपूर्ण प्रकरणातील गंभीर बाबींची दखल घेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. हा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून, त्यातील निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे डॉ. लहाडे यांनी स्पष्ट केले आहे.
