शासकीय शेतरस्त्यावर अतिक्रमण; रस्ता खुला करण्याची तहसीलदारांकडे मागणी
सिरोंचा : तालुक्यातील मौजा रंगधामपेठा चेक येथील शासकीय शेतरस्त्यावर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर रस्ता अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रंगधामपेठा चेक येथील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा शासकीय शेतरस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महसूल अभिलेख व गाव नकाशामध्ये रस्त्याची नोंद असतानाही प्रत्यक्ष वापरासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निवेदनानुसार, शासकीय शेतरस्ता सर्वे नं. १६९ पासून सुरू होऊन सर्वे नं. १७३ पर्यंत अस्तित्वात आहे. तसेच सर्वे नं. १०२ पासून सदर रस्ता लोखंडी काटेरी तारेची कुंपणे लावून पूर्णपणे अतिक्रमित करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, नांगरणी, पेरणी, कापणी, धान्य व शेतीमालाची वाहतूक यासाठी इतरांच्या शेतातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होण्याबरोबरच शेतकऱ्यांना वारंवार वादाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच बैल, गाय, म्हैस, शेळी आदी जनावरांना शेतात ने-आण करण्यासाठीही मोठी अडचण निर्माण होत आहे.
काही जमीनधारकांनी सदर जमीन पूर्वीच्या मालकांकडून खरेदी केल्याचे सांगून रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र, महसूल अभिलेख व गाव नकाशानुसार रस्ता शासकीय असल्याने संबंधित अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्ववत खुला करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सन १९९९ च्या प्रक्षेपणाचा गाव नकाशा व महसूल अभिलेखाच्या आधारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी व मोजणी करून सर्वे नं. १०२ पासून सर्वे नं. ५७ व ९३ तसेच सर्वे नं. ६४ व ६५ च्या शेवटपर्यंत असलेला संपूर्ण शेतरस्ता निश्चित करून त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. मधुकर कोल्लुरी यांच्या मार्फत तहसीलदार, सिरोंचा यांच्याकडे दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन साद करण्यात आले. तसेच यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा यांनाही निवेदन देण्यात आले आहे. निवेदनासोबत सन १९९९ चा प्रक्षेपणाचा गाव नकाशा तसेच गावकऱ्यांच्या स्वाक्षरीची यादी जोडण्यात आली आहे.
