राजुर्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! न्यायालयासमोर गोळीबार; तरुणाची निर्घृण हत्या
जाधव हत्याकांडातील ४ आरोपी पोलिसांच्या बेड्या; संतप्त जमावाकडून SDPO वाहनाची तोडफोड
Triveni News Express
प्रतिनिधी : रोहित वि. तिपट्टीवार
मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६
राजुरा : राजुरा शहरात मंगळवारी भरदिवसा घडलेल्या धक्कादायक गोळीबाराने संपूर्ण शहर हादरले. न्यायालयाच्या अगदी समोर, भरवस्तीत एका तरुणावर अगदी जवळून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या थरारक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. याचदरम्यान जमावाकडून SDPO यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली.
न्यायालयासमोरच तीन गोळ्या; डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू
पापा ऊर्फ विनोद जाधव हे राजुरा न्यायालयासमोरील नारळपाण्याच्या दुकानाजवळ बसले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. तोंडाला रुमाल बांधलेल्या हल्लेखोरांनी जाधव यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. यातील गोळी डोक्यात लागल्याने जाधव गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले.
घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोळीबारानंतर थेट पोलीस ठाण्यात शरणागती
गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार न होता थेट राजुरा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि शरणागती पत्करल्याची माहिती आहे. पोलिसांनी करण मेकलवार आणि करण बाविसकर या दोघांना ताब्यात घेतले.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी परवेश शेख आणि कार्तिक खामनकर या आणखी दोन आरोपींना अटक केली. त्यामुळे जाधव हत्याकांडातील एकूण चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
मुख्य सूत्रधार कोण? नागरिकांचा संतप्त सवाल
हत्येमागील नेमके कारण काय, या हत्येचा कट कोणी रचला आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. मात्र मुख्य सूत्रधार आणि कटातील इतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलीस ठाण्याबाहेर तणाव; जमावावर सौम्य लाठीचार्ज
घटनेची माहिती शहरात पसरताच संतप्त नागरिकांनी राजुरा पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. जमाव आक्रमक झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती आहे.
याच गोंधळादरम्यान संतप्त जमावाकडून उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राजुर्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त
गोळीबार आणि त्यानंतरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजुरा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
भरदिवसा न्यायालयासमोर झालेल्या या रक्तरंजित हत्याकांडामुळे राजुरा शहरात खळबळ उडाली असून, हत्येच्या कटामागील संपूर्ण सत्य बाहेर आणून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
