कुरखेड्यात अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा दणका; १९ जनावरांसह १९.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
१ ट्रक, १ बोलेरो पिकअपसह दोन आरोपींवर गुन्हा दाखलएर
Triveni News Express
प्रतिनिधी : सुगत उराडे
गडचिरोली | २४ ऑगस्ट २०२६
कुरखेडा : अवैध व्यवसाय आणि गैरकायदेशीर वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, कुरखेडा तालुक्यात अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. गेवर्धा–केशोरी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी १९ गोवंशीय जनावरांसह एक ट्रक व महिंद्रा बोलेरो पिकअप, असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. २४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांनी गेवर्धा ते केशोरी मार्गावर सापळा रचला.
यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या ट्रक व बोलेरो पिकअपला अडवून तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना देखील आरोपींकडे नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर आले.
१९ गोवंशीय जनावरे जप्त
पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत टीजी १२ यू ४८९६ क्रमांकाच्या अशोक लेलँड ट्रकमध्ये ११ गायी व २ बैल, अशी १३ जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत १ लाख ८५ हजार रुपये आहे.
तर एमएच ३५ एजे ४६०१ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये ४ गायी व २ बैल, अशी ६ जनावरे आढळली. त्यांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे.
दोन्ही वाहनांमधून एकूण १९ गोवंशीय जनावरे, अंदाजे २ लाख ६५ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. याशिवाय अंदाजे १२ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी शेख इब्राहिम शेख इस्माईल (वय ४०, रा. मेहबूब नगर, पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर) आणि मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (वय २५, रा. चिराग अली चौक, टेका नई बस्ती, नागपूर) यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात अप. क्र. १९१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११ (१)(अ), ११ (१)(ड), ११ (१)(इ), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. विश्वंबर कराळे, पोअं. तुषार खोब्रागडे, चापोअं. गणेश, तसेच कुरखेडा पोलीस ठाण्याचे परि. पोउपनि. कुणाल रेगुलवार, पोहवा. अजीतकुमार सुरजुसे आणि नापोअं. अमोल आलाम यांनी ही कारवाई केली.
