लॉयड्स हॉस्पिटलमध्ये तिळ्या बाळांचा सुखरूप जन्म; वैद्यकीय पथकाचा गौरव
उपसरपंच राकेश कवडो यांनी घेतली आईसह तिन्ही बाळांची आस्थेने विचारपूस; ORW निर्मला यांच्या समुपदेशनाने मातेला मिळाला विश्वास
Triveni News Express
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली | २४ ऑगस्ट २०२६
एटापल्ली : उच्च जोखमीच्या तिळ्या गर्भधारणेचे यशस्वी व्यवस्थापन करत माता शांता गावडे आणि त्यांच्या तिन्ही बाळांना सुखरूप ठेवण्यात हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाला यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरसलगोंदी ग्रामपंचायतीच्या वतीने वैद्यकीय पथकाचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
माता शांता गावडे यांच्या तिळ्या गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांनी ही गर्भधारणा उच्च जोखमीची असल्याने विशेष काळजी घेत उपचार सुरू केले. प्रसूतीदरम्यान आईसह तिन्ही बाळांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवत वैद्यकीय पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने उपचार केले. अखेर आईसह तिन्ही बाळांची सुखरूप प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले.
या पार्श्वभूमीवर हेडरीचे उपसरपंच राकेश कवडो आणि ग्रामसेविका कापुरडिया मॅडम यांनी लॉयड्स हॉस्पिटलला भेट देत माता शांता गावडे व त्यांच्या तिन्ही बाळांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबीयांना शुभेच्छा देत त्यांच्या वतीने भेटवस्तूही देण्यात आली. उपसरपंच राकेश कवडो यांच्या या संवेदनशील पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.
वैद्यकीय पथकाचा विशेष गौरव
तिळ्या गर्भधारणेचे यशस्वी व्यवस्थापन करून आईसह तिन्ही बाळांना सुखरूप ठेवण्यात योगदान देणाऱ्या स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी, डॉ. प्रीती बुर्तिवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. आकांक्ष रेड्डी, स्वाती रेड्डी तसेच भूलतज्ज्ञ डॉ. विवेक आणि डॉ. उमेश उत्तरवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पद्मसिंग दुलात, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन हेडरी यांचीही उपस्थिती होती.
ORW निर्मला यांच्या समुपदेशनाने मातेला मिळाला विश्वास
तिळ्या बाळांची उच्च जोखमीची गर्भधारणा असलेल्या माता शांता गावडे सुरुवातीला रुग्णालयात प्रसूती करण्यास तयार नव्हत्या. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्या डिस्चार्ज घेऊन घरी जाण्याच्या प्रयत्नात होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर ORW निर्मला यांनी तब्बल एक तास मातेशी त्यांच्या परिचित भाषेत प्रेमाने व समजुतीने संवाद साधला.
रुग्णालयातच प्रसूती करण्याचे महत्त्व, संभाव्य धोके आणि आईसह तिन्ही बाळांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयीन उपचार किती आवश्यक आहेत, हे त्यांनी समजावून सांगितले. त्यांच्या समुपदेशनामुळे मातेला विश्वास वाटला आणि त्यांनी रुग्णालयात प्रसूती करण्यास होकार दिला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने यशस्वी उपचार करत आईसह तिन्ही बाळांना सुखरूप ठेवले. या संपूर्ण प्रक्रियेत निर्मला यांचे समुपदेशन मोलाचे ठरले.
दुर्गम भागातील उच्च जोखमीच्या प्रसूतीचे आव्हान स्वीकारून आई आणि तिन्ही बाळांना सुखरूप ठेवणे ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या यशस्वी उपचारामुळे दुर्गम भागातील मातांना गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह आरोग्यसेवेचा नवा आधार मिळाल्याचे अधोरेखित झाले आहे.
